गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

मुंब्रा कडकडीत बंद


मुंब्रा कडकडीत बंद


मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज मुंब्र्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी शुक्रवारी बंदची हाक दिली होती. या बंदला तेथील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.

मुब्र्यातील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कधी नव्हे इतकी तत्परता दाखवत मागील चार दिवसांमध्ये शिळफाटा तसेच मुंब्र्यातल्या अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालवला. यामुळे अनेक वर्षांपासून या विभागात वास्तव्याला असणारे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हा भागात पाय रोवून आहेत. आपल्या मतदारांच्या घरांवर होणारी कारवाई त्यांना मोठी जड जाणार असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला आहे. आधी या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु आहेत ती पाडा, अशी मागणी या दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. इमारत पडल्याने 'तोंड पोळलेल्या' महापालिकेने आधीच राहत्या घरांवर कारवाई केली आणि जनतेची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळेच बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

गडचिरोलीमध्ये चकमकीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोलीमध्ये चकमकीत चार नक्षलवादी ठार
गडचिरोली- छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्‍यातील भटपार या गावाजवळच्या जंगलात काल रात्रीच्या सुमारास पोलिस गस्त घालत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात चार नक्षलवादी ठार झाले. परंतु, या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. चार नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

चकमकीचे वृत्त मिळाल्यानंतर या परिसरातील पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह इतर नक्षलवादी घेऊन जात असल्याने चकमकीत प्रत्यक्ष किती नक्षलवादी ठार झाले, याची नेमकी माहिती मिळत नाही.